रविवार, १५ एप्रिल, २०१२

जीवनाचे रंग

खरं तर नेहमी प्रवास म्हटला कि माझी जरा कुरकुरच असायची . पण काही न काही कारणाने तो करावा लागतोच. त्यातही बसने! अशाच एका आवश्यक कारणासाठी मला पुण्याहून कोपरगावला जायचे होते. पुणे कोपरगाव रेल्वेचीसुद्धा त्या दिवशी व्यवस्था करता आली नाही. मग मी निघाले बसने. जरा नाराजीतच!

प्रवास सुरु झाला. रस्त्यात वेगवेगळी गावं लागत होती. तसे मला निसर्गसौंदर्य आवडत असले तरी त्यात फारशी रमून जाणारी मी नव्हे आणि माझा रस्ताही तसा नव्हता. रस्त्यात लहान मोठी खेडी लागत होती. मला बसचा प्रवास या कारणा साठी आवडत नसे कि बसमध्ये लागणाऱ्या धक्क्यांमुळे वाचन करता येत नाही. काही वाचता येत नसल्याने आणि खिडकीजवळची जागा असल्याने मी शेवटी बाहेरचे निरीक्षण करू लागले आणि तिथून पुढे माझा बसचा प्रवास कसा गेला कळलेच नाही.

कारण त्यादिवशी मला महाराष्ट्राच्या एका छोट्याशा पण मजेदार घटकाचे दर्शन झाले. प्रत्येक खेड्यागणिक बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची भाशा बदलत होती. रस्त्यावरच्या लोकांचे वेगवेगळे पोशाख बघायला मिळत होते. महाराष्ट्र म्हणजे केवळ पुणे मुंबई आणि तिथला सुशिक्षित शहरी परिसर नाही तर काही मैलागणिक बदलत जाणारी भाषा, खाद्यसंस्कृती, वेशभूषा आहे याची मला जाणीव झाली. पुण्याच्या पांढरपेशा वातावरणाची सवय असललेल्या मला ते सगळं मजेदार तर वाटतच होतं . माझ्या वैयक्तिक मतानुसार निसर्गाचा सर्वात सुंदर अविष्कार मानवच आहे. त्यात जे वैविध्य आहे ते मला निसर्गाच्या वैविध्यापेक्षा जास्त भावते. माणसे बघणे, समजून घेणे हा सुद्धा पर्यटनाचा महत्वाचा भाग ठरू शकतो. मला जाणीव होत होती कि आपण ज्या जगात जगत आहोत त्या जगाला समांतर अशी कितीतरी जग या जगात जगत आहेत. प्रत्येकजण उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहे. हि सर्वजणही माणसंच आहेत आणि आपणही माणसंच आहोत. मानवाच्या अस्तित्वाचे किती विविध अविष्कार या जगात आहेत!

पण या सगळ्या गोष्टींच्या मागे केवळ एक वैविध्य याहीपलीकडे काहीतरी आहे. सगळ्या सुसंधींचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल कि त्यातल्या ९०-९५ % संधी केवळ पुणे, मुंबई आणि इतर काही छोट्या शहरांमध्येच मिळतात. उच्चशिक्षण हा तर त्याचा एक छोटासा भाग झाला, पण साहित्य, संस्कृती, कला या गोष्टी सुद्धा या खेड्यातल्या लोकांना मिळू शकत नाहीत. पुण्यात घराबाहेर पडावे तर जागोजागी वाचनालये दिसतात हवी तेवढी पुस्तके मिळतात, पण एखाद्या छोट्याशा खेड्यात तुम्ही जाल तर दिसेल कि एखादे साहित्यिक पुस्तकच काय पण कधीकधी मुलांची क्रमिक पुस्तकेही मिळणे अवघड होऊन बसते मग या लोकांमध्ये कशी काय उच्च दर्जाची अभिरुची निर्माण होईल? त्यांना ती आवड नसते असे मुळीच नाही. तसे असायचे काही करणाच नाही पण उपलब्धता तर हवी ना ! संगीत किव्वा इतर कला या लोकांमध्ये नसतात असेही नाही. कला हि तर दैवी देणगी आहे. पण तरीही हे लोक त्या कलांच्या शास्त्रशुद्ध शिक्षणापासून वंचित राहतात आणि त्यांची प्रगती होऊ शकत नाही. शहरात मात्र मुलांमध्ये कला असोत व नसोत लहानपणापासूनच त्याला या सगळ्या गोष्टींचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये एक सांस्कृतिक दरी निर्माण होते.

अर्थात असे होणे साहजिक असले तरी आपण त्याकडे डोळेझाक करतो आणि उलट या लोकांमध्ये बऱ्याचदा या गोष्टीबद्दल सुपिरिओरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो.. हा विचार केला जात नाही कि जर त्यांनाही आपल्यासारख्या संधी, घरातले वातावरण मिळाले असते तर तेदेखील आज वेगळ्या स्तरावर राहिले असते. या कॉम्प्लेक्स मुळे त्या लोकांचा आत्मविश्वास आणखीन खचत जातो आणि ती दरी वाढत जाते. म्हणूनच अशा स्तरांना जमेल ती मदत करून पुद्धे आणण्याचा प्रयत्न करणे श्रेयस्कर होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा