रविवार, १५ एप्रिल, २०१२

युगंधर

युगंधर या कादंबरीविषयी बोलायचं झालं तर सर्वप्रथम या महान साहित्याविष्काराला "कादंबरी" असेदेखील म्हणावेसे वाटत नाही. हा तर आहे एक दिव्य प्रवास, विराट विश्वरूप विश्वत्म्याच्या दिव्य अशा मानवयोनीचा! हे शिवधनुष्य पेलण्याचं कार्य तितक्याच ताकदीने आणि सरसतेने केलं गेलं आहे. श्रीकृष्ण, जो अख्ख्या भारतवर्षाच्या मनावर आजही अधिराज्य गाजवत आहे किंबहुना तो सर्वांच्या आत्म्यातच स्थित आहे, त्याचा जीवनपट उलगडून दाखवतांना आदरणीय शिवाजी सावंत यांच्या लेखणीला जी धार चढली आहे ती अभूतपूर्व आहे.

मला या प्रवासात आणखीनच उल्लेखनीय आणि अद्वितीय वाटला तो लेखकाचा दृष्टीकोन आणि उद्देश!. ज्या प्रकारे त्यांनी या दिव्य आणि अद्भुत वाटणाऱ्या घटनांची मांडणी केली आहे ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती संस्कृतीची महान सेवा वाटते. कारण त्यांनी पौराणिक श्रीकृष्णचरीत्राचे संदर्भ, भोळ्याभाबड्या भक्तगणांनी रचलेल्या काही खऱ्या तर काही काल्पनिक कथा, अंधश्रद्धा , वेगवेगळ्या प्रकारचे आकलन या सर्वांचे श्रेष्ठ मंथन केले. त्यातील अंधाश्राद्धात्मक आणि काल्पनिक भाग बाजूला काढला आणि जणू काही त्या बालगोपालाला आवडणारे शुद्ध लोणीच त्याला नैवेद्य म्हणून अर्पण केले आणि त्याचा रसग्रहणात्मक प्रसाद आपल्याला वाटला.

याचं महत्वाचा वैशिष्ट्य म्हणजे हे सगळं करतांना कुठेही थोडीदेखील कृष्णालीलांची सरसता कमी झालेली नाही. मग ते दही दूध चोरणं असो, मुरलीवादन असो, रासक्रीडेचा अलौकिक अनुभव असो, राक्षसमर्दन किंवा कुरुक्षेत्रातील भगवद्गीता असो. बुद्धिवादाच्या सावलीत कुठेही प्रेम, भक्ती झाकोळून गेलेली नाही. कुठेही कृष्णाचं परमात्मस्वरूप विसरून त्याला मानवांच्या श्रेणीत बसवण्यात आलेलं नाही. त्याच्या त्या घननीळ भग्वद्स्वरूपला कुठेही धक्का लागलेला नाही. याउलट जनसामान्यांना कृष्णलीलांच्या रसग्रहनाबरोबरच त्यामागच्या महान उद्दिष्टाचेही आकलन होते. त्यामुळे पुरुषोत्तम श्रीकृष्णाविषयी प्रेम, भक्ती आणि भावना अधिक डोळस आणि समृद्धच होते.

त्यामुळे श्रीकृष्णचरित्र हे अद्भुत आणि अमानवी न वाटता वाचकांना तो प्रत्येकातच कमी जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यतेचाच अविष्कार वाटतो आणि परमात्म्याच्या "अवतार" या संकल्पनेमागचा जीवनाचे आदर्श स्थापित करण्याचा उद्देश लक्षात येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा