अध्यात्म हि गोष्ट बऱ्याच ठिकाणी दिसते. पण वास्तविक अध्यात्म म्हणजे काय? हे ज्याच्या त्याच्या वैयक्तिक अनुभवावरून ठरते. असे असले तरी किमान आपण ज्या गुरूंना मानतो, ज्यांचे अनुयायी आहोत त्यांची शिकवण जगवणे हि एक मुलभूत बाब आहे. खरे तर गुरु किंवा देवता यांच्यावर एका व्यक्तीप्रमाणे प्रेम करणे साहजिक आहे पण अशा प्रकारच्या व्यक्तीपूजेबरोबरच तत्वपूजा झाली तर आपल्याला अध्यात्माचा खरा अनुभव येऊ शकतो. एखाद्या देवतेचा किंवा महात्म्याचा फोटो लावणे, मूर्ती बनवणे, त्यासमोर तासंतास बसून राहणे हे तर ठीकच आहे पण त्याबरोबरच त्या देवतेला किंवा महात्म्याला तत्वस्वरुपात स्वतःमध्ये स्थापित करणे अधिक आवश्यक आहे. कारण प्रेमाचा खरा अर्थ एकरूपता हाच आहे आणि अशी एकरूपता खोलवर पोहोचल्यावरच साधली जाऊ शकते. जेव्हा आपण खोलवर जातो तेव्हाच वैचारिक पातळीवर पोहचू शकतो. एखाद्याशी एकरूप होण्यासाठी त्याच्या अंतःकरणाचा ठाव घ्यावा लागतो, त्याच्या विचारांशी एकरूप व्हावे लागते. त्याच्या स्वभावाशी एकरूप व्हावे लागते. मगच तो सुखद अनुभव प्राप्त होतो आणि भावनाहीन असलेल्या बाह्य उपचारांचा फोलपणा जाणवू लागतो.
एकदा रस्त्याने जात असता एका संन्यासी महापुरुषाच्या प्रतिमेची मिरवणूक जातांना दिसली. ही मिरवणूक जरी एका संन्याशाची असली तरी त्यात सहभागी झालेले त्यांचे शिष्य आणि विशेष करून शिष्या यांचा थाट एखाद्या लग्नातल्या वरातीपेक्षा काही कमी नव्हता. उंची कपडे, एकापेक्षा एक भारी वस्तु , वेगवेगळे मेक अप्स असा होता. असे नाही कि हे सगळे करूच नये, पण किमान ज्यांच्यासाठी ही मिरवणूक चालली आहे त्यांच्या तत्वांचा आदर त्या मिरवणुकीत तरी करायला हवा. स्वतःला अध्यात्मिक समजत असलेल्या लोकांना हे किमान प्रसंगावधान असावे.
एकीकडे संयम, वैराग्य शिकवणारी प्रवचने चालू असतात आणि त्याच मंडपाबाहेर चाट, मिठाई, केक अशी विविध दुकाने असतात आणि सगळे भाविक त्रास होणार असला तरीही त्याची मजा लुटत असतात. नेहमीप्रमाणे काही जणांची आपसात निन्दानालस्ती चालू असते. खाण्यापिण्याची मजा लुटणे वाईट नाही पण हा प्रश्न उपस्थित होतो कि या प्रवचनातून लोक काय घेतात? कित्येकांचा तर असा समज आहे कि नुसत्या श्रवणानेच कल्याण होते. आचरण बदलण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात नाहीत. आपण जे ऐकले त्याचा विचार करणे, त्याप्रमाणे वागणे या गोष्टी झाल्या तरच हे सगळे सफल होईल. अन्यथा ते एक मनोरंजन बनून राहील. कार्यक्रम आयोजित करणारे लोकच अशा विसंगत गोष्टी एकत्र ठेवतात. अध्यात्म हि काही एवढी स्वस्त गोष्ट नाही कि जी नुसत्या श्रवणाने साध्य होईल. काही मजा करूच नये असे नाही पण हे दुटप्पी वागणेही योग्य नाही. कारण त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो.
ही तर अतिशय लहान गोष्ट आहे पण काहीवेळा तर आयुष्यभर शांततेचा उपदेश करणाऱ्या संतांच्या कार्यक्रमात हिंसाचार होतो. हे सगळे त्या महापुरुषाच्या उपदेशाशी अत्यंत विसंगत असते. त्या महापुरुषाच्या शिष्यांनी त्याच्याच मिरवणुकीत त्याच्याच शिकावानिवीरुद्ध वागणे त्या महापुरुषाला त्याच्या अंगावर कितीही उंची फुले उधळली तरी रुचण्यासारखे आहे का? त्या निःस्वार्थी आत्म्याला कितीही उंची भेटवस्तू प्रदान केल्या तरी आनंद होणार आहे का? ज्यांचे संपूर्ण आयुष्य विरक्त पद्धतीने गेले त्यांना या लौकिक प्रेमाचा आणि भौतिक गोष्टींचा काय मोह? त्याने आपल्याला क्षणिक मानसिक समाधानाशिवाय काहीच मिळत नाही.
आसाराम बापू की जय
उत्तर द्याहटवा